नाशिक : नाशिकरोड भागातील श्री बालाजी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशीन सापडल्या नंतर या प्रकरणी 9 डॉक्टरांसह 11 जणांविरुध्द खटला दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल झाला आहे.
रुग्णालयाचा परवाना देखील नाही : नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी तथा बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ.राजेंद्र भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे सोनोग्राफी मशीन आढळून आले होते. कायद्यानुसार कोणतेही मशीन हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याआधी अथवा ते बाळगण्यास महापालिका वैद्यकीय विभागाची परवानगी बंधनकारक असते. 16 डिसेंबर 2021 रोजी नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरात श्री बालाजी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनपा पथकाने टाकलेल्या धाडीत अनधिकृत सोनोग्राफी मशीनआढळून आले होते. विशेष म्हणजे संबंधित रुग्णालयाचा परवाना देखील नाही. रुग्णालयाची इमारत डॉ. भंडारींच्या मालकीची आहे. त्यांच्या नावाने हे रुग्णालय सुरू होते.
मशीनसह रुग्णालय सील : मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी मशीनसह रुग्णालय सील केले आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. भंडारी दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच अनधिकृतपणे सोनोग्राफी मशीन आढळल्याने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे.
न्यायालयात खटला दाखल : नाशिक महापालिकेच्या विशेष सरकारी वकिलाने न्यायालयात खटला दाखल केला असून, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत खटला चालविला जाणार आहे. तसेच डॉ. भंडारींवर बडतर्फीची कारवाई करण्याचा सुधारित प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि 50 हजार रुपयांच्या शिक्षेची तरतूद आहे. अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन बाळगणे आणि ठेवल्याप्रकरणी संबंधित कायद्यांतर्गत डॉ. भंडारींसह नऊ डॉक्टर, बँकेचे एक व्यवस्थापक आणि आणखी एक अशा 11 लोकांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
यांच्यावर खटला दाखल : याप्रकरणी नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनीता भंडारी, शुभम हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पवार, डॉ. विजय ज्योती, डॉ.अजित जुनागडे, डॉ. शरद गोतरकर,डॉ.प्रशांत भुतडा, डॉ. सतीश पात्रीकर, डॉ. राजेंद्र जाधव, ईआरबीएयएस इंजिनिअरिंग कंपनी, तत्कालीन बँक मॅनेजर- बँक ऑफ महाराष्ट्र नाशिकरोड यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. भंडारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केल्याचे समजते. 28 डिसेंबर रोजी वैद्यकीय विभागाने कारवाईचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केल्यानंतर दुरुस्तीसाठी तो पुन्हा पाठवण्यात आला आहे. आता सुधारित प्रस्ताव मंगळवारी मिळेल.
हेही वाचा : Nashik Sinner Road Accident : नाशिक-सिन्नर अपघात; अंबरनाथमध्ले 9 तर कल्याणामधील १ ठार