नाशिक - राज्यात कोरोना विषाणूने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. मात्र, कोरोना विषाणू बाधितांच्या तपासणी केंद्रांची संख्याही महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. आता नाशिक शहरातही कोरोना स्वॅबचे तपासणी केंद्र सुरू होणार आहे. शहरातील डॉ. वसंत पवार महाविद्यालयात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे किंवा धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. परिणामी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत आहे. आता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नाशिकच्या डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय लवकरच लॅब सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे. तर दररोज 50 ते 60 संशयित रुग्णांचे अहवाल पुणे आणि धुळे येथील रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मात्र, हे अहवाल येण्यास उशीर होत असल्याने रुग्णांच्या आजाराचे निदान लवकर न झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी देखील अडचणी निर्माण होत आहेत. आता दातार जेनेटिक्स आणि अपोलो हॉस्पिटल यांनीदेखील त्यांच्या कडील कोरोना चाचणी किट डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाला मोफत उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे लॅबच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. त्यामुळे लवकरच पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब तपासणी केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि दातार जनेटिक्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक नागपूर येथे प्रशिक्षणासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.