नाशिक - नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरी देखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आता अशा नागरिकांची प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतं असून, रोज 5 ते 6 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, वैद्यकीय सुविधा वगळता जीवनावश्यक वस्तू खरेदीवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र असं असताना देखील काही नागरिक वैद्यकीय कारण सांगून घराबाहेर पडत असल्याने, पोलिसांनी आता याविरोधात कडक भूमिका घेतली असून, शहरातील प्रमुख रस्त्यावर नाकेबंदी कऱण्यात आली आहे. पोलिसांनी यासाठी होमगार्ड तसेच सामाजिक काम करणाऱ्या एसपीओ नेमल्या आहेत. दुपारी 11 वाजेनंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकंची कोरोना टेस्ट करण्यात येत असून, त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड देखील आकारण्यात येत आहे.
पॉझिटिव्ह आढळल्यास कोविड सेंटरमध्ये रवानगी
नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र काही नागरीकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. दूध, किराणा, औषध याचे कारण सांगत ते घराबाहेर पडत आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरीकांना आम्ही 500 रुपयांचा दंड आकारत असून, त्यांची कोरोना चाचणी करत आहोत. यात जर कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्याला आम्ही कोविड सेंटरमध्ये पाठवत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार यांनी सांगितलं आहे.
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
नाशिकमध्ये कोरोनाचे आकडे रोज वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा वगळता इतर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र या नंतर सुद्धा काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर आम्ही दंडात्मक कारवाई करत असून, त्यांची कोरोना चाचणी करत आहोत. यासाठी शहरातील 13 पोलीस स्टेशनांतर्गत ठीक - ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून, नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पाडू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी केले आहे.
हेही वाचा - गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ