नाशिक - केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियम फाट्यावर मारण्यात आले. यात्रेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. थेट मंत्र्यांकडूनच नियम पायदळी तुडवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी
केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ओझर विमानतळ येथून सुरुवात झाली आहे. यात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. सोशल डिस्टिंगचा फज्जा उडाला होता. सत्कार असणाऱ्या स्टेजवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ओझरमध्ये जागो जागी फटाके फोडून आणि औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. डाॅ. पवार यांच्या हस्ते पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत धान्य वाटप करण्यात आले. पण, या कार्यक्रमात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचा यावेळी सर्वांनाच विसर पडला होता. विषेश म्हणजे सर्व ठिकाणी पोलीस उपस्थित राहून बघ्याच्या भूमिकेत होते. नियम मोडल्यावर सामान्य जनतेवर कारवाई होते. पण, राजकीय नेत्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी आमदार राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, यतीन कदम, माजी आमदार मंदाकिनी कदम, तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, शंकरराव वाघ आदी उपस्थीत होते.
ओझरमध्ये समस्त मुस्लिम समाजाकडून भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. समाजाच्या वतीने त्यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.