नाशिक - जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांना अक्षरशः झोळी करून आरोग्य कर्मचारी रुग्णालयात दाखल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच अनेक वयस्कर रुग्णांना चालण्यास त्रास होत असल्याने त्यांना खाली बसून जिन्यावरून घसरत घसरत इमारतीवरून खाली उतरावे लागत आहे. वयस्कर रुग्णांची फरफट बघून आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात. त्यामुळे गेल्या वर्षी शासनाने या रुग्णालयाला प्रथम क्रमांक देऊन जिल्हा आरोग्य विभागाचे कैतुक केले होते. मात्र, आता कोरोना काळात कोरोना कक्षात जाण्यासाठीची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांची फरफट होत आहे. रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून झोळी करून वयस्कर रुग्णांना उपचारासाठी दाखल करत आहेत.
एकीकडे नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारती मागे सिंहस्थ कुंभमेळा इमारतीत कोरोना कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणची लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने वयस्कर रुग्णांचे मोठे हाल होत आहे. या इमारतीची देखभाल करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून त्यांना जिल्हा रुग्णालयाकडून वारंवार सांगून सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वारंवार लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडत असून त्याचा नाहक त्रास गरीब, वयस्कर रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना होत आहे.
लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होत असतो. कधीकधी क्षमतेपेक्षा अधिकजण लिफ्टमध्ये शिरल्यानंतर त्यांच्या वजनाने लिफ्ट बंद होते. लिफ्टची दुरुस्ती कशी चांगली होईल? याकडे आम्ही लक्ष देऊ, असे प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश जेजुरकर यांनी सांगितले.