नाशिक : कोरोनामुळे मनाला सुन्न करणाऱ्या घटना कुठे ना कुठे घडत आहे. आरोग्य यंत्रणांच्या अभावी अनेकांचा बळी जात आहे. चांदवड तालुक्यातील खंगाळवाडी येथील कोरोना रुग्णालाही अशाच प्रकारे औषधोपचार न मिळाल्याने हॉस्पिटलच्या दारातच मृत्यूला सामोरे जावे लागल्याची घटना घडली.
कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होईनासा झाला आहे. यामुळे दररोज कोरोनासंदर्भात नवनवीन घटना घडत असल्याने अशा घटनांनी माणूस मन सुन्न होत आहे.कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि वेळीच खबरदारी घेतली जात नसल्याने अनेक रूग्णांना प्राणाला मुकावे लागत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर बेडचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे बेडसाठी वणवण भटकणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहे. चांदवड तालुक्यातील खंगाळवाडी, वडनेर येथील अरूण माळी हे चांदवडला उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी अत्यवस्थेतच दाखल झाले. रुग्णालयाच्या दाराशी त्यांची पत्नी त्यांना घेऊन उपचारासाठी टाहो फोडत होत्या तर दुसरीकडे अरूण माळी ऑक्सीजनसाठी तडफडत होते. अखेर काही वेळाने त्यांनी रुग्णालयाच्या दारातच अखेरचा श्वास घेतला.
याप्रकरणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि जिल्हा शल्यचिकीत्सकांना पत्र देत चौकशी करण्याची मागणी केली होती. याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना खुलासा पाठवला असून, त्यात संबंधित रूग्णांचे सॅच्युरेशन ३२ ते ३५ इतके होते. यानंतरही रुग्णालयातील स्टेबल असलेल्या रूग्णाचा बेड देण्याची तयारी केली जात होती. मात्र यादरम्यानच संबंधित रूग्णाचा मृत्यू झाल्याचे यात म्हटले आहे. एकूणच कोरोनापुढे यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात आहे.
हेही वाचा : भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण अन्य रुग्णांची तडफड पाहून 'त्याने' सोडले प्राण