दिंडोरी (नाशिक)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सध्या प्रवाशी वाहतूक बंद आहे. बस स्थानकातील कॅन्टीन, रसवंती, वृत्तपत्र विक्रेते यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. मात्र, सध्या येथील दुकानाचे भाडे सुरू आहे. व्यवसाय ठप्प आणि भाडे सुरू त्यामुळे येथील व्यावसायिक संकटात सापडले आहेत. बस सेवा जोपर्यंत बंद आहे. तोपर्यंतचे भाडे माफ करावे, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकही आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडत आहेत. बस स्थानकातील कॅन्टीन, रसवंती, वृत्तपत्र विक्री, अशा प्रकारचे छोटे, मोठे व्यवसायांचा गाडा प्रवाशांवर अवलंबून असतो. मात्र, सध्या प्रवासी वाहतून बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुकानाचे भाडेही देणे शक्य नाही. त्यामुळे बस सेवा बंद आहे तोपर्यंत भाडे आकारू नये, असे येथील व्यावसायिक मागणी करत आहेत.
दिंडोरी तालुक्यात पिंपळगाव, कळवण या मुख्य डेपोमधून खेड्यापाड्यात बस धावते. मार्च, एप्रिल, मे जून या महिन्यात लग्नसराई, विद्यार्थांच्या शाळा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक होते. मात्र, यावेळी कोरोनामुळे सर्वकाही ठप्प आहे. याचा फटका बस स्थानकातील व्यावसायिकांना बसला आहे.