नाशिक - चिकन खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होतो. या एका अफवेमुळे चिकन उद्योगाचे होत्याचे नव्हते झाले आहे. एका महिन्यात महाराष्ट्रात चिकन उद्योगाचे 900 कोटींचे नुकसान झाले असून पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून असलेल्या सोयाबीन आणि मक्याच्या शेतकऱ्यांचे देखील 500 कोटींचे नुकसान झाल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून मुंबई इथे चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करावे, असे पोल्ट्री व्यवसायिकांनी म्हटले आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजला असून दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरचा संसर्ग होतो. या अफवेमुळे महाराष्ट्रातील पोल्ट्री आणि चिकन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अशा अफवांमुळे या उद्योगात 50 टक्के घट झाली आहे. पोल्ट्री व्यावसायिकाला 1 किलोची कोंबडी तयार करण्यासाठी 70 रुपये इतका खर्च लागतो. दरोरोज एका कोंबडीला 200 ग्रॅम खाद्य लागते. मात्र, आज खाद्य विकत घेण्यासाठी देखील पोल्ट्री मालकांकडे पैसे नाहीत. नाईलाजाने पोल्ट्री व्यावसायिकांना 20 रुपये किलो ने जिवंत कोंबडीची विक्री करावी लागत आहे.
हेही वाचा - 'कोरोना'चे प्रतिकात्मक दहन, नाशिककरांनी साजरी केली अनोखी होळी
चिकनची मागणी घटल्याने महाराष्ट्रभारतील पोल्ट्री फार्ममध्ये दीड कोटी कोंबड्या पडून आहेत. या उद्योगातून 3 लाख लोकांना रोजगार मिळत असून ते देखील अडचणीत आले आहेत. पोल्ट्री व्यवसायावर सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरी अवलंबून आहेत. पोल्ट्रीचा व्यवसाय अडचणीत आल्याने मका आणि सोयाबीनचे भाव देखील खाली आले आहेत. मका 2000 रुपये क्विंटलवरून 1500 क्विंटल तर सोयाबीन देखील 4500 रुपये क्विंटल होता तो आता 3900 रुपये क्विंटलने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील जवळपास 500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - इगतपुरील्या विपश्यना केंद्रातील पुढील सत्र बंद ठेवा, भुजबळांचे आदेश
केंद्र सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांनी मुंबई येथे चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करावे आणि चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही याबाबत जनजागृती करण्याची मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.