नाशिक - मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे. यातच कोथिंबिरीचे भाव गगणाला भिडले असून कळवण तालुक्यातील औत्यापाणी येथील कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल ३३१ रुपयांचा भाव मिळाला आहे.
गेल्या आठवड्यापासून कोथिंबीरीच्या दरात मोठी वाढ होत आहे. नाशिक बाजार समितीत कळवण तालुक्यातील औत्यापाणी गावातील काशिनाथ कामडी यांच्या कोथिंबिरीला प्रति शेकडा ३३ हजार १०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. त्यांनी आणलेल्या ३५४ जुड्यांना प्रति जुडी ३३१ रुपये दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कोथंबिरीचा दर २२ हजार रुपये प्रति शेकडा होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतिची कोथिंबीर आहे त्यांना आता सोन्याचा भाव मिळणार आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, सुरगाण आणि दिंडोरी तालुक्यात ७ जुलैला जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या तुलनेत कळवण तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील भाजीपाला सुस्थितीत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये भाजीपाला, फळभाज्या यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होत नसल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे.
आडत बंदनंतर प्रथमच मिळाला विक्रमी दर
नाशिक बाजार समितीमध्ये प्रथमच आडत बंद झाल्यानंतर कोथिंबिरीला प्रति जुडी ३३१ रुपये दर मिळाला. यापूर्वी जेव्हा आडत सुरु होती तेव्हा २७० रुपये दर मिळाला असल्याचे शिवांजली कंपनीचे संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले.