नाशिक - नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने शहरातील आरोग्य व्यवस्था कमी पडू लागली आहे. यावर उपाय म्हणून नाशिक महापालिकेने शहरातील संभाजी स्टेडियमचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये केले आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची मनमाडला भेट; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
शहरात विविध ठिकाणी आणखी १ हजार खाटांची व्यवस्था
नाशिक जिल्ह्यासह शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. यातच आता वाढत्या रुग्णसंख्येपुढे आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. यावर उपाय म्हणून आता नाशिक महानगरपालिका प्रशासनाने नवीन नाशिक भागात असलेल्या संभाजी स्टेडियमचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून येत नाही, ती आणि ज्या रुग्णांना आयसोलेशनची सुविधा मिळत नाही त्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज या ठिकाणचा पाहणी दौरा केला. यावेळी शहरात विविध ठिकाणी आणखी एक हजार खाटांची व्यवस्था केली जात असल्याचे जाधव यानी सांगितले.
रुग्णसंख्या वाढत असल्याने नाशिककरांनी काळजी घेण्याच आवाहन
शहरातील कोविड सेंटर्स आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. त्यावर महापालिका आयुक्त आता स्वतः मैदानात उतरून उपाययोजना करत आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या 30 हजारांहून अधिक बधितांवर उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, हा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गरज नसताना घराबाहेर पडणे टाळून प्रदुर्भाव नियंत्रणात आणायला मदत करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ९६७ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत २ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
हेही वाचा - नाशिक : एकाच रात्री दिंडोरी तालुक्यातील पाच गाईचा मृत्यू