नाशिक - काँग्रेसमधील सक्रिय महिला पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घ्या, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना दिला आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक होते. याप्रसंगी दानवे बोलत होते.
आज नाशिकच्या रॉयल हेरीटेज हॉटेलमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्यने भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित्या होत्या. २ दिवस चालणाऱ्या या कार्यकारिणीची बैठकीत वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांकडून महिलांना भाजपची धोरणे, महिलांबाबत सरकारने घेतलेले निर्णय, महिलांसाठी असलेल्या योजना याची माहिती दिली जाणार आहे.
देशातील सर्व महत्त्वाचे पक्ष एकत्रित येऊन मोदींचा प्रभाव करण्याचे स्वप्न त्यांनी बघितले होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही, 1971 नंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार देशात आल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. राजकारणात कधीच कुणाची इच्छा पूर्ण होत नसते, मनात इच्छा घेऊन चला आज नाहीतर उद्या पद मिळेल असा सल्लाही महिला कार्यकर्त्यांना दानवेंनी दिला. राजकारणात 33 टक्के आरक्षण महिलांना मिळाले पाहिजे, अशी भूमिका असून त्याबाबतच्या लवकरच विधेयक मंजूर होईल असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला.
सर्वात जास्त महिला या भाजपमधून निवडून आल्या आहेत. काँग्रेसच्या सक्रिय महिला पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घ्या, असा सल्लाही त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना दिला. लोकसभेच्या निवडणुकीत महिलांनी आणि युवकांनी जास्त मतदान केल्यामुळे भाजप सत्तेवर आल्याचे म्हणत दानवेंनी महिलांचे आभार मानले. सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवा असे म्हणत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाकलून लावा, असे आवाहनही दानवे यांनी केले.
या कार्यक्रमाल भारतीय जनता पार्टीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, रोहिणी नायडू, सुजाता करंजगीकर आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.