नाशिक - सिडको परिसरातील उड्डाणपूलावरून भाजप आणि शिवसेनेदरम्यान पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपाने या पुलाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला, तर हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
तर कार्यक्रम उधळून लावू -
सिडको परिसरातील मायको सर्कल ते त्र्यंबकेश्वर रोड या वाय अँगल उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. या पुलाच्या भूमिपूजनावरून भाजप आणि सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई आता पुन्हा सुरू झाली आहे. या पुलासाठी शिवसेने पाठपुरावा केल्याने निधी मंजूर झाला असून सत्ताधारी भाजपने या पुलाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला, तर कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन -
शहरातील मायको सर्कलवरून सुरूवात होणाऱ्या या पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या पुलासाठी आम्ही निधी दिला, त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगत पुलाचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन पद्धतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडेल, असा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
भूमिपूजन नेमके कुणाच्या हस्ते होणार -
दरम्यान, या पुलाच्या कामासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा खर्च होणार असून गेल्या काही महिन्यांपासून या पुलाच्या श्रेयवादावरून सुरू असलेला भाजप आणि शिवसेनेनेमधील संघर्ष आता विकोपाला गेला आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षातील वाढता संघर्ष पक्ष पाहता या पुलाचे भूमिपूजन नेमके कुणाच्या हस्ते होणार आणि कोण या उड्डाणपुलाचे श्रेय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - उत्तराखंड हिमस्खलन : १८ दिवसानंतरही बचावकार्य सुरुच, ७० मृतदेह सापडले