नाशिक - दोन वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन केले होते. याप्रकरणी आज त्यांच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवडे या गावात जाऊन समृद्धी महामार्गाविरोधात जाहीर सभा घेतली होती.
शेट्टी यांनी घेतलेली ही सभा बेकायदेशीर असल्याचे कारण देत सिन्नर पोलीस ठाण्यात त्यांच्यासह नाशिकमधील कॉम्रेड राजू देसले आणि इतर स्थानिक नेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर निवडणुकीच्या कालावधीत, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून सरकार आमची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप नाशिकमधील स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही सरकार विरोधात आंदोलन करणारच, अशी भूमिका यावेळी स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणात राजू शेट्टी काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.