नाशिक - पिपळगाव परिसरात असलेल्या आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिपीका अजय ताकाटे (वय 18) असे तिचे नाव असून ती कारसुळ येथील रहिवासी आहे.
पिंपळगाव येथील महाविद्यालयात बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेली दीपिका सोमवार (दि.१५) सकाळी नियमितपणे बसने महाविद्यालयात आली. मात्र, त्यानंतर ती महाविद्यालयातून घराकडे परतलीच नाही. त्यामुळे पालकांनी तिचा शोध सुरू केला. पंरतु दीपिकाचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. अखेर पालकांनी पिंपळगाव पोलिसांत धाव घेतली. त्याच वेळी आहेरगावचे पोलीस पाटील हे देखील येथील डाव्या कालव्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती देण्यासाठी आले होते. त्यानंतर ताबडतोब पोलीस आणि दीपिकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी तो मृतदेह दीपिकाचाच असल्याचे आढळून आले.
घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज-
आहेरगाव परिसरातील अवघे पाच फूट पाणी असलेल्या डाव्या कालव्यात तिचा मृतदेह सापडल्याने तिचा घातपात झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तविला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत असून घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन तिचा मृतदहे विच्छेदनासाठी पिंपळगाव बसवंत येथुन नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पुढील तपास पिपळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत....
वडलांची काही महिन्यांपूर्वी आत्महत्या....
दीपिकाचे वडलांनी आठ महिन्यापूर्वीच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. वडलांच्या जाण्याने दीपिका व १० वर्षाचा लहान भाऊ या दोघांनीही वडिलांच्या दुःखातून सावरत शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. मात्र दीपिकाचा मृतदेह असा आढळून आल्याने नक्कीच घातपात झाल्याचा दाट संशय आहे. दीपिका मुळची राहणार कारसुळ येथील मात्र शिक्षण घेण्यासाठी ती पिंपळगाव महाविद्यालयात येत होती. त्यातच परिसरातच असलेल्या पाच किलोमीटर अंतरावर आहेरगाव येथे तिचा मृतदेह आढळल्याने तिचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.