नाशिक - शहरातील फुलेनगर परिसरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी बॅरिकेटिंगसाठी बांधलेल्या दोराला अडकून महापालिकेच्या निवृत्त सफाई कर्मचाऱ्याचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. किशोर चव्हाण असे मृताचे नाव आहे. तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी स्वच्छता कर्मचारी रजबेन चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किशोर चव्हाण यांच्या पत्नी या महापालिकेत स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांना कामावर सोडण्यासाठी पहाटे ५ वाजता किशोर चव्हाण हे जात असताना फुलेनगर परिसरातील शनी चौकात पोलिसांनी बांधलेला दोर त्यांच्या लक्षात आला नाही. त्यांची दुचाकी दोराला अडकून खाली कोसळली. त्यातच किशोर चव्हाण यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सद्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्वच यंत्रणा युद्धपाळीवर काम करत आहेत. त्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. शहरातील संपूर्ण स्वच्छतेची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी अगदी पोटतिडकीने आपल्या कामाचा व्याप सांभाळत आहेत. मात्र त्यातच आज अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.