नाशिक - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळवण शहरात आजपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला व्यावसायिकांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
कळवण शहरात कोरोना रुग्णांची संख्या 10 झाली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी कळवणकर नागरिक व कळवण शहर व्यापारी महासंघाच्यावतीने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. शहरातील मेडिकल सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय आजपासून पुढील सात दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.
बुधवारी एकाच वेळी १० रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी व्यापारी महासंघाची बैठक होऊन त्यात जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातर्फे पॉझिटिव्ह रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी मास्क वापरावा व विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.