येवला ( नाशिक) - येवल्यामधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना येवलेकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यात येणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करून देखील शहर प्रशासन रस्ते दुरुस्त करत नसल्याने अखेर येवलेकरांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून प्रशासनाचा निषेध केला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
'खड्डे भाऊ आगे बढो'
दरम्यान यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, 'खड्डे भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. रस्त्यांची अवस्था अतीशय वाईट झाली आहे. वारंवार मागणी करून, निवेदने देऊन देखील रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले नाहीत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करण्यासाठी आज केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे.