नाशिक : राज्याच्या महिला, बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत रस्त्यावर राहणाऱ्या बालकांकरीता 1 मे पासून बालस्नेही फिरते पथक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिकसह, मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये बालस्नेही उपक्रम राबवला जात आहे. नाशिक शहरात हा उपक्रम शिव सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आहे. यात आतापर्यंत शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या 11 ठिकाणांवरील 207 बालकांची माहिती संस्थेने संकलित केली आहे.
वाहनात दिले जाते शिक्षण : या मुलांना रस्त्यावर राहणाऱ्या ठिकाणी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यासोबतच या मुलांची वैद्यकीय तपासणी, आधारकार्ड, शैक्षणिक प्रवेश, समुपदेशन, पुनर्वसन या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
आधार कार्ड मिळणार : रस्त्यावर राहणाऱ्या या बालकांना ओळख मिळावी याकरिता महिला बाल विकास विभाग, आधार सेवा केंद्र, द्वारका तसेच शिव सह्याद्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात आतापर्यंत जवळपास 80 बालकांची आधारकार्ड तयार करण्यात आली आहेत. तसेच या मुलांचे लसीकरण झाले नसेल, त्यांचे लसीकरण करणे, अंगणवाडीत जाणाऱ्या वयातील बालकांना अंगणवाडीत दाखल करणे, शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश, बालाकांना पौष्टिक आहार पुरवणे अशा, अनेक उपाययोजना या उपक्रमातून राबवल्या जात आहेत. पुढील सहा महिने बालस्नेही उपक्रम सुरूच राहणार आहे.
शासनाच्या निर्णयाचे कौतुक : आम्ही परभणीहून नाशिकला कामानिमित्त आलो. आमच्याकडे राहण्याची सोय नाही, म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला राहतो. दिवसभर गजरे, खेळणी विकून काम करतो. त्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला आवडला आहे. आमच्या मुलांना आम्ही जिथे राहतो तिथे येऊन शिक्षण दिले जात आहे. आम्ही शिकलो नाही. मात्र, आमची मुले शिकतील याचा जास्त आनंद आहे असे, रस्त्यावर राहणाऱ्या एका मुलीच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.