नाशिक - चिकन बिर्याणी फक्त 25 रुपयात, असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. मात्र, कोरोना व्हायरसमुळे 25 रुपयात चिकन बिर्याणी विकण्याची वेळ पोल्ट्री फार्मसवर आली आहे. दरम्यान, चिकनमध्ये प्रोटीन असून ते आरोग्यासाठी अपायकारक नसून ते सर्वांनी खावे, यासाठी पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडस असोसिएशनने नाशिकच्या डोंगरे वसतीगृहाच्या ग्राउंडवर 2 दिवसीय चिकन फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या ठिकाणी 35 रुपयांत चिकन बिर्याणी, चिकन टीका आणि अंडी थाळी येथे देण्यात येत आहे.
चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशा प्रकारची अफवा पसरल्यामुळे चिकन खाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे याचा परिमाण थेट पोल्ट्री फार्मर्स, ब्रीडस आणि किरकोळ चिकन विक्रेत्यांवर झाला आहे. त्यामुळे चिकनची किंमत 200 रुपये किलोवरून 100 रुपये किलोवर येऊन ठेपली आहे. तर चिकन पोल्ट्री व्यावसायिकांना 30 ते 35 रुपयांनी किलो चिकन विकावे लागत आहे. त्यामुळे या चिकन फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे.
या चिकन फेस्टीवलमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांसाठी 25 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्या दिवशी 6 ते 7 हजार नागरिकांनी चिकन फेस्टिव्हलला भेट देत चिकनचा आस्वाद घेतला.
नाशिक जिल्हयात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय असून वार्षिक 2 हजार करोड रूपायांची उलाढाल या व्यवसायात होते. मात्र, कोरोना व्हायरस अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या बर्ड फ्लूची प्रचिती यंदा देखील चिकन व्यवसायांना कोरोना व्हायरसमुळे आली आहे.
- वैद्यकीय सल्ला
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांमध्ये देखील असतात. चीनमध्ये कच्चे मास खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्यातून कोरोना व्हायरसचे विषाणू पसरले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, भारतात कच्चे मास खाण्याची प्रथा नाही. येथो इथे कुठलेही मांस 100 डिग्रीपेक्षा अधिक तापमानात शिजवले जाते. त्यामुळे अशात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही, असे सागंण्यात आले आहे.