नाशिक - जिल्हा नियोजन समितीचा निधी परस्पर विक्री केल्याप्रकरणी नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. याच प्रकरणावरुन आमदार कांदे यांना मुंबईहून थेट छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करुन धमकी दिल्याची तक्रार आमदार कांदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
हेही वाचा - MPSC Result: दोन वर्षानंतर MPSCचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम
- काय आहे प्रकरण?
पालकमंत्री भुजबळ व आमदार कांदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खटके उडत आहेत. नांदगावमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी आमदारांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे केली होती. यावेळी आयोजित बैठकीतच दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले. परंतु, त्यानंतर हे प्रकरण शांत झालेले असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन आमदार कांदेंनी थेट न्यायालयातच दावा दाखल केला. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झाला.
- छोटा राजन टोळीचा फोन?
पालकमंत्री भुजबळांनी 10 कोटी रुपयांच्या कामाचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला. त्याविरोधात न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घे, नाही तर आमच्याशी गाठ आहे, असा फोन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने एका क्रमांकावरुन केल्याचे आमदार सुहास कांदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून पडले बाहेर !