नाशिक - जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी व शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण विनाशुल्क देण्यात यावे, या मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने निफाड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पती ताब्यात
नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला असून अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्षं, सोयाबीन, मका, कापूस, कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने सर्वच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हजारो एकरावरील द्राक्षांचे पीक धोक्यात आले आहे. फुलोरा अवस्थेतील बागा संकटात सापडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो, भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच सोंगणीला आलेले व सोंगूण ठेवलेले पिकं पावसामुळे खराब झाली आहेत. मका, बाजरी, ज्वारी आदींचा चारासुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचा प्रश्नसुद्धा गंभीर बनला आहे.
हेही वाचा - अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरी; शेतकऱ्याला १ लाख २५ हजाराचे नुकसान
भौगोलीक विस्तार व झालेले नुकसान पाहता पंचनामे करण्यासाठी वेळ कमी आहे. फक्त उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत आहेत. सोंगणी करून शेतात ठेवलेल्या किंवा वाळत घातलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे नाकारले जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांना यामुळे भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे. शेतकऱ्यांवर असा अन्याय होऊ नये यासाठी, उभ्या पिकांबरोबरच सोंगणी करून रचून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
ग्रामपंचायतीमार्फत नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईसाठी १०० टक्के पंचनामे करावेत, असा ठराव विहीत मार्गाने शासनाकडे मागवण्यात यावे. वेळेत पंचनामे व्हावेत यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे व भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी पुरता कोलमडलेला आहे. त्यामुळे शेतकऱयांना भरीव नुकसान भरपाई तातडीने खात्यात जमा करावी ही विनंतीही केली आहे. परिस्थितीनुसार शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून त्याचा कधीही भडका होईल, याची वाट न पाहता शासनाने आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन दिलासा द्यावा. अन्यथा मोठ्या जनआंदोलनास प्रशासनाने तयार रहावे , असा छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने इशारा देण्यात आला आहे.
यावेळी करण गायकर (संस्थापक अध्यक्ष शिवा तेलंग, युवक प्रदेश अध्यक्ष), उमेश शिंदे ( विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष) ,शिवाजी मोरे (प्रदेश महासचिव), संतोष माळोदे, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, नितीन दातीर, सतीश नवले, वंदना कोल्हे, ज्ञानेश्वर थोरात, नितीन सातपुते, किरण बोरसे, नितीन पाटील, सागर पवार, गणेश दळवी, सागर शेजवळ, तुषार क्षीरसागर आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.