येवला - 'रोईंगपटू दत्तू भोकनळ याला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व क्रीडा मंत्र्यांना पत्र देऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे', अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते येवल्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांना याबाबतची माहिती दिली.
शरद पवार राष्ट्रपती होतील?
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. याबाबत छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'पवार साहेब राष्ट्रपती व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी स्वतः सांगितलंय की माझा पक्ष लहान आहे. मला राष्ट्रपती होण्याची इच्छा नाही. त्यांच्या नावाची चर्चा आहे. कारण ते सिनियर आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग आहे', असे भुजबळांनी म्हटले.
'लसीचा तुटवढा'
'राज्याला हवा तेवढा कोरोना लसीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरण वेगाने होत नाही. लसीचा साठा मुबलक उपलब्ध झाल्यास लवकर लसीकरण होईल. सर्वांना लस मिळेल', असेही भुजबळांनी म्हटले आहे.
'ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावं'
'मराठा आरक्षणासाठी जसे सर्वजण एकत्र लढतात, तसे ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र लढा दिला पाहिजे. सर्वांनी एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे', असे भुजबळांनी म्हटले.
हेही वाचा - अमृता फडणवीसांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा? नव्या पोस्टवरून चर्चेचा धुरळा