नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी मुंबईचा आमदार आणि महापौर दोन्ही होतो. तेव्हा मुख्यमंत्री शाळेत होते, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नाशिक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप बूथ प्रमुखांना संबोधित करताना त्यांनी भुजबळांवर टीका केली होती. छगन भुजबळ हे स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे, तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेले आहेत. अजून तुमची सुटका झालेली नाही, तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात. किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, असे ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. मी मुंबईचा आमदार आणि महापौर दोन्ही होतो. त्यावेळी शरद पवार विरोधक म्हणून माझ्यासमोर बसायचे. तेव्हा तुम्ही शाळेत जात होतात, हे लक्षात ठेवा. गरिब जनतेसाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार आहे, अशा कडक शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.