नाशिक - जगाच्या पाठीवर कुठेच सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी बस सेवा फायद्यात नाही. त्यामुळे बस सेवा सुरू करण्याआधी महानगरपालिकेने सखोल अभ्यास करावा, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच बस सेवेचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारकडून कुठल्याच मदतीची अपेक्षा ठेवू नका, असेही भुजबळ यांनी महानगरपालिकेला ठणकावून सांगितले.
हेही वाचा - 'फोन टॅप होत असल्याचे कळताच मी फोनवर बोलणे बंद केले'
भुजबळ म्हणाले की, शहराचा विकास झालाच पाहिजे, महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा निर्णय घेताना अभ्यास करून व सर्व बाबींचा सखोल विचार करून ठेवा. बसच्या पायाभूत सुविधेसाठी साधारण 80 कोटी रुपये खर्च येणार आहे. 200 बसेस जरी चालवल्या तरी वार्षिक 55 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. ही वस्तुस्थिती महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणावी. यासाठी शासनाकडून अनुदानाची तरतूद नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - नाशकात ११ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले राष्ट्रगीत
नाशिक महानगरपालिकेला शासनाने मदत केली, तर इतर शहरातील महानगरपालिका मदतीसाठी मागणी करतील. नाशिक महानगरपालिकेने पत्राद्वारे बस सेवेसाठी राज्य शासनाकडून अनुदानाची मागणी केल्यानंतर भुजबळ यांनी त्यास ब्रेक लावला. मुंबईतील पालिकेची बेस्ट बस सेवा कोट्यवधींचा तोटा सहन करत आहे. त्यांना आर्थिक मदत दिली नाही, उद्या नाशिकला मदत दिली, तर पुणे, ठाणे, मुंबई अशा सर्वच पालिका मागणी करतील. त्यामुळे आत्ताच तोटा दिसत असेल, तर मग व्यवस्थितपणे विचार करून निर्णय घ्या, असेही भुजबळ यांनी महानगरपालिकेला सांगितलं.