नाशिक Chandra Grahan 2023 : यंदा खंडग्रास चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी आले आहे. त्यामुळं कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पाहावा की नाही, अशा आशयाचे प्रश्न अनेकांना पडले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आपण ग्रहण काळात काय करावं, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया.
'या' राशीच्या व्यक्तींनी ग्रहण पाहू नये : अश्विन शु.15 कोजागिरी पौर्णिमा ग्रहणासारखा उपासनेसाठी दुसरा मुहूर्त नाही. 28 ऑक्टोबर रोजी, चंद्र ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे.अशात मेष,वृषभ,कन्या व मकर राशीच्या व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये, असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटलंय. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवारी सायंकाळी 7.41 पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत, बाकी सर्वांनी दुपारी 3.14 पासून ग्रहणाचे वेधादि नियम पाळावेत, ग्रहण पर्वकाळ रात्री 1 तास 18 मिनिटे आहे. तर ग्रहण स्पर्श 1.05 मिनिट, ग्रहण 1.44 मिनिटे आणि ग्रहण मोक्ष 2.23 मिनिटे असा आहे.
ग्रहण काळात काय करावे : वेध काळामध्ये व ग्रहण काळात स्नान,दान,जप,तप, देवपूजा, श्राद्ध, तर्पण,अनुष्ठान इत्यादी करता येतील. ग्रहण सुरू झाल्यानंतर म्हणजे रात्री 1.05 मिनिटापासून सर्वांनी मनोभावे भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, विष्णुसहस्त्रनाम, रामनामाचा जप, गुरु मंत्र जप, पुरश्चरण किंवा कोणताही धर्म ग्रंथ वाचू शकतात. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावं आणि ग्रहण मोक्षानंतर सुद्धा स्नान करावं, कोजागिरी पौर्णिमेस प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीच्यावेळी लक्ष्मी, चंद्र व इंद्राचे पूजन करून केशरयुक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल, मात्र प्रसाद म्हणून केवळ चमचाभर दूध प्राशन करावे. ही खगोलीय घटना आहे त्यामुळं धार्मिकते बरोबर वैज्ञानिक दृष्टीने पण या दिव्य घटनेकडे पाहावे. विनाकारण अंधश्रद्धा व धर्मशास्त्रात नसलेल्या गोष्टी पसरवू नये, असंही महंत पीठाधीश्वर डाॅ.अनिकेतशास्त्री महाराज यांनी म्हटलंय.
नाशिकमध्ये पूर्ण प्रमाणात चंद्रदर्शन नाही : नाशिकमध्ये ग्रहण सुरू होईल तेव्हा चंद्राचा काही भाग झाकला जाईल. दरम्यान, नाशिकसह देशभरात या वर्षाचे चंद्रदर्शन एक सारखेच असेल. तसंच हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असून शनिवारी दुपारपासून त्याचे वेध लागतील.
खगोल अभ्यासक काय म्हणतात : ग्रहण ही शंभर टक्के नैसर्गिक घटना आहे, त्यामुळं हा काळ अशुभ नाही. पूर्वी विज्ञान फारसे प्रगत नव्हतं त्यामुळं याविषयी अंधश्रद्धा होती, नंतर चंद्रावर मानव पोहोचला आणि आता तर आपले यान ही पोहोचले. त्यामुळं आधुनिक जगात फक्त नैसर्गिक क्रिया म्हणून याकडे पाहून दिनक्रम सुरू ठेवावा असं खगोल अभ्यासक गिरीश पिंपळे यांनी म्हटलंय.
चंद्राला न दाखवताच घ्यावे लागणार दूध : कोजागिरीच्या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात घोटलेले दूध पिण्याची प्रथा यंदा खंडित होणारा असून ग्रहणाचे वेध दुपारपासूनच लागणार असल्याने दुसऱ्या दिवशी दूध प्राशन करण्याचा सल्ला पंचांगात देण्यात आलाय. चंद्राला ग्रहण लागणार असल्यानं त्या प्रकाशाच्या संपर्कात आलेले अन्न दूषित मानले जाते, त्यामुळं यंदा चंद्रापासून दूध दूरच ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा -