नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे. आज(16 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना अज्ञात कारणामुळे कमी करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी कर्मचाऱ्याकडून दहा लाखांची लाच चुंभळे यांनी मागितली होती. दरम्यान, तडजोड करून रक्कम तीन लाखांवर आणण्यात आली. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. आज ही रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
ही कारवाई अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिवाजी चुंबळे यांची एसीबीकडून चार तास कसून चौकशी करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच राजकीय नेत्यांनी नाशिक लाचलुचपत कार्यालयाखाली मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.