नाशिक Hiray Brothers FIR : महात्मा गांधी विद्या मंदिर तसंच आदिवासी सेवा समिती नाशिक या दोन संस्थांच्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नीती आयोगाच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे, अपूर्व हिरे यांनी हा अपहार केला आहे असा आरोप आहे. तसंच संचालक मंडळ, तत्कालीन मुख्यध्यापकांनी शाळेच्या अनुदानात गैरव्यवहार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
शासकीय निधीचा अपहार : नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठलराव देवरे यांच्या फिर्यादीनुसार, महात्मा गांधी विद्या मंदिर तसंच आदिवासी सेवा समितीचे संचालक प्रशांत हिरे, डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात संचालक तसंच तत्कालीन मुख्याध्यापकांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी केंद्राच्या अटल इनोव्हेशन मिशन उपक्रमांतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून NITI आयोगामार्फत सरकारच्या अटींची पूर्तता करणाऱ्या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब (ATL लॅब)ची स्थापना केली जाते. मात्र, हिरे यांनी सरकारची फसवणूक करुन 1 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र, नंतर शाळांची तपासणी केली असता, या शाळांमध्ये संबंधित लॅबच नसल्याचं समोर आलं. याप्रकरणी शाळेचे पदाधिकारी, संचालक, तत्कालीन मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित : भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचं डॉ. अपूर्व हिरे यांनी सांगितलं. नीती आयोगाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. केवळ राजकीय हेतूने खटले दाखल करण्यात आले आहेत. उपनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील तक्रारदाराला आम्ही वैयक्तिकरित्या ओळखत नाही. विनाकारण मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असं डॉ. अपूर्व हिरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -