नाशिक - नाशिक लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करू इच्छिणाऱ्या शिवाजी वाघ उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० हजार रुपयाची चिल्लर आणली. परंतु, प्रशासनाने मुदतीत नाणी मोजून देण्याचे फर्मान सोडल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धावपळ उडाली.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटचा दिवस होता. नाशिक शहरात वास्तव्य असलेले शिवाजी वाघ हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी एक वाजता दाखल झाले. अर्ज भरण्यासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम भरणे अनिवार्य होते.
वाघ यांनी १५ हजार रुपयांच्या नोटा आणि चिल्लर १० हजार रुपये अनामत रक्कम भरण्यासाठी आणल्याची माहिती त्यांनी मध्यवर्ती सभागृहात दिली. परंतु अन्य अपक्ष उमेदवारांची एकाच वेळी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. वाघ यांनी एक हजार रुपयांच्या १० थैल्या तयार कराव्यात असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वाघ यांच्या समर्थकांवर १० हजार रुपये मोजून घेण्याची वेळ आली.
दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने वाघसह सर्वच अपक्ष उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले. परंतु त्यानंतरही त्यांचे समर्थक अनामत रक्कम भरण्यासाठी आणलेली चिल्लर नाणी मोजण्यातच व्यस्त होते. परंतु, वेळ झाल्याने आणि चिल्लर असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज घेतला नसल्याची माहिती अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी सांगितले. एवढी दमछाक करूनही उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही, म्हणून शिवाजी वाघ यांनी प्रशासनाचा निषेध केला.