मालेगाव (नाशिक) - जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील बीएससीपीएल या कपंनीने मालेगावकरांसाठी मदतीचा हात पुढे केला. मालेगावकरांसाठीअन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे 500 किट देऊन कंपनीने रमजान ईद या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मालेगाव शहरात झपाट्याने वाढत असल्याने या साथरोग प्रतिबंधासाठी शहराच्या कार्यक्षेत्रात संचारबंदी जाहीर झाली आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र झटत आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे शहरातील सर्व पावरलूम व इतर व्यवसाय सुद्धा बंद असल्याने मजूर व शेतमजूर यांना उदरनिर्वाहासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विविध सेवाभावी संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांना मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनानुसार मदत मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून एका वाहनातून जीवनावश्यक वस्तूंचे 500 किट मालेगावसाठी रवाना करण्यात आले. या किटमध्ये 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो दाळ, 1 लिटर तेल, 250 ग्रॅम हळद व 250 ग्रॅम खजूर आदींचा समावेश आहे.
मालेगावसाठी जिल्हा प्रशासन सदैव सतर्क व संवेदनशील आहे. कोरोनाच्या संकटात वेळोवळी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा, तसेच जीवनावश्यक व अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे. यापूर्वीही मालेगावातील डॉक्टरांसाठी 140 पीपीई किट, 12 हजार मास्क, 600 लिटर सॅनिटायझर तसेच नागरिकांसाठी 10 हजार किलो तांदूळ, पंधरा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंच्या 700 किटचे वितरण करण्यात आले आहे.
आवश्यकता भासल्यास भविष्यातही विविध संस्था, संघटनांशी संपर्क करून प्रशासन जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.