नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गालगत उड्डाणपुलाखाली बीएसएनएलच्या केबल दुरुस्तीसाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. हरी राजाराम टिळे (४६, रा. मोहगाव, नाशिक) असे मृत कामगाराचे नाव आहे. यात आणखी एक मजूर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
के. के. वाघ महाविद्यालयासमोर उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. याचठिकाणी बीएसएनएलचे कंत्राटी कामगार केबल दुरुस्तीचे काम करत असून, एक-दोन कामगार खाली उतरलेले असतांना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला. यात एक कामगार ढिगाऱ्याखाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा कामगार किरकोळ जखमी झाला असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक अशोक साखरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या खड्ड्यातून कामगाराला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. कोल्हे यांनी दिली. पुढील प्रक्रियेसाठी हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.