नाशिक - येवला तालुक्यात ठाणगाव-पाटोदा रस्त्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला आहे. सागर रानोबा खुरसने असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्यासोबत असलेला मुलगा व भाऊ यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना येवलाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सागर रानोबा खुरसने हे गुढीपाडव्याच्या निमित्त ठाणगाव या आपल्या गावी आले होते. ते ठाणगाव येथून दुचाकीवर मुलगा व भावासोबत मनमाडकडे येत असताना हा अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत येवला तालुका पोलिसांना माहिती देऊनही पोलीस सुमारे दोन तासानंतर घटनास्थळी आले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जर सैन्यात असलेल्या जवानांच्या बाबतीत पोलीस इतके बेफिकीरपणे वागत असतील तर सामान्यांचे काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
सागर खुरासने हे घरी सुट्टीवर आले होते. ते विवाहित असून त्यांच्या मागे पत्नी, आई-वडील आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.