नाशिक- बहिणीशी प्रेमसंबंधाच्या संशयावरून भावाने मित्रांच्या मदतीने विवेक शिंदे या युवकाची हत्या केली. डोंगरआळी, संभाजी चौकात हा प्रकार घडला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीसांनी या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा- यवतमाळमध्ये दोन तरुणांवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर
डोंगरआळी, संभाजी चौकात शनिवारी दिनांक 9 डिसेंबरच्या मध्यरात्री विवेक शिंदे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. घटना टोळी युद्धातून झाल्याची चर्चा होत असतांना पोलीसांनी तपास चक्र फिरवत काही तासांतच सराईत गुन्हेगार सुशांत वाबळे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता हत्या मागील कारण समोर आले आहे. विवेकच्या हत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर रात्रीतून हल्लेखोर हे मुंबईला गेले होते. तर एका हल्लेखोर शहरातच पोलिसांच्या हाती लागला होता.
रविवारी पहाटे सहाय्यक पोलीस निरिक्षक राकेश हांडे, उपनिरीक्षक डी बी मोहिते आणि त्यांच्या पथकाने आरोपी शंभू जाधव, शिवा जाधव, भुषण शिंदे या तिघांना मुंबईतून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सराईत गुन्हेगार सुशांत वाबळे याच्यावर तडीपार प्रस्तावाची चौकशी सुरू असल्याची माहितीही पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.