नाशिक : जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताची टंचाई जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी प्रमाणात झालेले रक्तदान, आणि कोरोना रुग्णांमुळे वैद्यकीय सेवांवर आलेला ताण यामुळे ही रक्तटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका सामान्य रुग्णांना तर बसतोच आहे. मात्र, थॅलेसेमियासारख्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांची या टंचाईमुळे अधिक परवड होत आहे.
कोरोना सुरू झाल्यापासूनच रक्ताची सगळीकडेच मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. अपघातात जखमी झालेले रुग्ण, थॅलेसेमियासारखे आजार असणारे रुग्ण या सर्वांना रक्तटंचाईचा मोठा फटका बसला आहे. पेढीमध्ये येणारे रक्त कमी प्रमाणात आहे, मात्र रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक तेवढा रक्तपुरवठा करण्यास आम्हाला अडचण येत आहे, अशी माहिती नाशिकमधील अर्पण रक्तपेढीच्या वैद्यकीय संचालिका वैशाली काळिंब यांनी दिली.
रक्तदात्यांची संख्या कमी..
सध्या रक्तदात्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. कोरोनापूर्व काळात आमच्याकडे महिन्याला सरासरी दोन हजार पिशव्या रक्त जमा होत होते. मात्र, सध्या ही संख्या केवळ पाचशे ते सहाशेच्या घरात गेली आहे. असे असले, तरी रक्ताची मागणी ही तेवढीच राहिल्यामुळे आमच्यावर बराच ताण येतो आहे, असे वैशाली यांनी सांगितले.
थॅलेसेमिया रुग्णांची होतिये परवड..
सध्या मुंबईमध्ये १९८ थॅलेसेमिया रुग्ण आहेत. तर, नाशिकमध्ये २१४ थॅलेसेमिया रुग्ण आहेत. यामध्ये लहान मुलांना तर महिन्याला किमान एक बॅग रक्त द्यावेच लागते. जसजसे त्यांचे वय वाढते, त्यांना जास्त रक्ताची गरज पडते. अशा रुग्णांना प्राधान्य द्यावे लागल्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांसाठी ऐनवेळी रक्त पुरवण्यासाठी धावपळ करावी लागते.
ऑर्गन-बोन मॅरो ट्रान्सप्लांट..
नाशिकमध्ये सध्या ऑर्गन ट्रान्सप्लांट होत आहे. यासोबतच काही ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटही होत आहे. अशा शस्त्रक्रियांवेळी आम्हाला एकावेळी चाळीस ते साठ बॅग्सची तरतूद करावी लागते.
प्लाझ्मा आणि रक्तदान करण्याचे आवाहन..
सध्या रक्तासोबतच कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा दान करणेही आवश्यक आहे. १८ ते ६५ वयोगटातील व्यक्ती रक्तदान करु शकतात. त्यामुळे तरुणांना स्वतः पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन काळिंब यांनी यावेळी केले.