नाशिक - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात नेत्यांचा पक्ष प्रवेश होत असताना, या प्रवेशावर टीका करण्यासाठी नाशिक मध्ये 'भाजपमध्ये प्रवेश देणे असल्याचे' फलक गंगापूर रोड परिसरात पाहायला मिळाले आहे.
भाजपला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच नाशकातील हे फलक चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, हे फलक विरोधकांनी लावले की या पक्ष प्रवेशाला कंटाळलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, या वरून राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे.
काय आहे पोस्टरवर -
भाजपमध्ये प्रवेश देणे आहे, अशा आशयाचे हे फलक असून त्यात अटी व शर्थी देण्यात आल्या आहेत. पहिली अट ईडी व आयकर विभागाची नोटीस आली असणे, भ्रष्टाचाराचा आरोप आहे तर तिसरी अट सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा आहे. तसेच फलकावर एक टीप दिली असून त्यात विचारधारेची कोणतेही अट नाही. तसेच आमच्याकडे जागा नसल्यास मित्र पक्षात प्रवेश दिला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.