नाशिक - राज्यात युती तुटल्याने त्याचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर देखील होऊ शकतो. महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांची समीकरणं देखील आता बदलू शकतात. नाशिक महापालिकेतही समीकरणं बदलण्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे.
हेही वाचा - नांदगाव शहरातून दुचाकी चोरास अटक; १४ मोटारसायकली हस्तगत
सद्याच्या स्थितीत महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. तर, शिवसेना ही विरोधी बाकावर आहे. भाजपचे संख्याबळ 66 आहे, शिवसेना 34, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 6, मनसे 5 आणि इतर 4 अशी सद्याची स्थिती आहे. महापालिकेत सत्तेसाठी 61 चा बहुमताच्या आकड्याची आवश्यकता असते, जर भाजपच्या गोटातील नाराज गट सत्तेसाठी सेना - राष्ट्रवादीसोबत आला तर भाजपची सत्ता जाऊ शकते. तसेच महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा महापौर, उपमहापौर होऊ शकतो. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता समीकरणं बदल्यामुळे स्थानिक राजकारणातही फटका बसण्याची चिन्हं आहेत. तसेच नाशिक महापालिकेतही सत्तापालटाची समीकरणं नक्कीच बदलतील, असे सुतोवाच देखील स्थानिक शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी केले आहे.