नाशिक - नांदगाव मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार माजी आमदार संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विकासाच्या मुद्द्यावर हा पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नांदगावात महायुतीसाठी हा मोठा धक्का मानाला जात आहे.
संजय पवार हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार होते. आमदार पंकज भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. संजय पवार नांदगाव मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटाचे प्रमुख दावेदार होते. युतीच्या जागावाटपात हा मतदार संघ शिवसेनेला गेल्याने पवार यांची मोठी अडचण झाली होती. शुक्रवारी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भुजबळ यांना पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा - नाशकात शिवसेना नेत्याने घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट; उलट-सुलट चर्चेला उधाण
राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांसमोर भाजपच्या बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. काहींनी आपली उमेदवारी दाखल केली. तर काहींनी काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पवार यांच्या पाठिंब्याकडे त्याच दृष्टीने बघितले जात आहे.
हेही वाचा - भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे रिकाम्या खुर्च्यांसमोर 'रोखठोक भाषण'
दरम्यान, संजय पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे युतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या अडचणीत वाढ झाली असुन मराठा समाजाला आणि मराठा समाजाच्या मोर्चाला ज्यांनी शिव्या घातल्या अशा उमेदवाराला पाडण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.