सटाणा (नाशिक) - वयोवृद्ध आजी-आजोबांना भेटून दुचाकीवरून घरी परतताना दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात दोधेश्वर येथील घाटातील अवघड वळणावर झाला. या अपघातात युवक जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दीपक जिभाऊ पिंपळसे (वय - 18) असे मृताचे नाव आहे.
बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथून दीपक पिंपळसे, विशाल पिंपळसे (वय -16) आणि प्रकाश संजय पिंपळसे (वय - 12) हे तिघे दुचाकी (क्र. एमएच 41, एच 6729) वरून जुनी शेमळी येथे वयोवृद्ध आजी-आजोबांना भेटण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचला तिघे पुन्हा आखतवाडेकडे परतत होते. यावेळी सटाण्यापासून जवळच असलेल्या दोधेश्वर येथील घाटातील अवघड वळणावर दीपक पिंपळसे याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तिघे युवक दुचाकीसह कड्यावरील एका मोठ्या खड्ड्यात जाऊन आदळले. या अपघातात दीपकच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने नाशिकला हलविण्यात आले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरु आहे.