नाशिक - दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे बिबट्याने सात शेळ्या आणि दोन गाई फस्त केल्याची घटना घडली. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. या शेळ्या बिबट्याने जंगल परिसरात ओढून नेल्या होत्या. शेळ्यांचा मृत्यू जंगलात झाल्याचे कारण देत वनविभागाने या घटनांचे पंचनामे करण्यास सपशेल नकार दिल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे.
हिरामन तुकाराम खांडवी यांच्या खोरीपाडा शिवारातील शेतात दोन गाई बांधावर बांधलेल्या होत्या. या गाई बिबट्याने फस्त केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपुर्वी खांडवी यांच्या याच शेतात एक गाय बिबट्याने फस्त केली होती. तेव्हा त्यांना नुकसानभरपाई मिळाली होती. मात्र, आता नियमावली दाखवून अधिकारी भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली
खोरीपाडा येथील जयराम यशवंत राऊत या आदिवासी शेतकऱ्याच्या सात शेळ्या बिबट्याने हल्ला करून मारून टाकल्या. या शेळ्या त्याने जंगलात ओढून नेल्या होत्या. बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या जखमीदेखील झाल्या आहेत. वन अधिकारी हात वर करत असल्यामुळे तक्रार करायची तरी कुणाकडे, असा सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.