नाशिक - पावसाळा जवळ आल्याने महावितरणकडून विद्युत ताऱ्याजवळ वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे काम सकाळपासून सुरू आहे. त्यामुळे सकाळपासूनच वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे बिटको रुग्णालयातील जनरेटर लावण्यात आले होते. रुग्णालयात लावलेल्या जनरेटच्या बॅटरीचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, रुग्णालयातील सर्व रुग्ण व डॉक्टर कर्मचारी घाबरले.
या स्फोटात बिटको रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला. पंखे एक्स-रे यंत्रणा बंद पडली. डॉक्टरांना आलेल्या रुग्णांची अंधारात तपासणी करावी लागत होती. यावेळी रुग्णांनी व डॉक्टरांनी आपल्याजवळील मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश देत रुग्णाची शस्त्रक्रिया केल्या. बिट्को रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण हे बाळंतपणासाठी आलेल्या महिला असतात त्यामुळे याठिकाणी नवजात शिशुंची संख्या मोठ्या प्रमाणात असते, शहरातील तापमान हे ३८ अंश सेल्सिअंश आहे. त्यामुळे येथील रूग्ण उकाड्याने हैराण झाले आहेत. जनरेटरची देखभाल करण्यासाठी पालिकेने विद्युत विभागातील विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तरीही बॅटरीच्या स्फोटासारखी धोकादायक घटना घडल्याने याकडे अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे समोर दिसून येत आहे