नाशिक - भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला राजकीय पक्ष आहे. या पक्षाची भूकच भागत नाही. या भुकेमुळे आणि फोडाफोडीमुळे पक्षातील एकनाथ खडसे यांसारखे अनेक नेते दुखी आहेत. हे नेते लवकरच काँग्रेस पक्षात येतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी थोरात बोलत होते. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली, हे मान्य आहे. मात्र, त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, सध्या भाजपकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातील काहींना चौकशीची भिती आहे तर काहींना लोकसभा निवडणुकीनंतर असुरक्षित वाटू लागल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मात्र, बाहेरच्या लोकांच्या येण्याने मूळ भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताबद्दल बोलताना थोरात यांनी त्या निव्वळ वावड्या असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारचा प्रचार करण्यात भाजपच अग्रस्थानी असून त्यांच्या रणनितीचा तो भाग असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशपातळीवर होत असलेल्या झुंडबळीच्या घटना दुर्देवी आहेत. गरीब, अल्पसंख्याक समाजावर हल्ले, धमक्या देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्याचे समर्थन कोणी करू नये. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी पुढाकार घ्यावा आणि झुंंडबळीच्या विरोधात कडक कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे थोरातांनी सांगितले.