नाशिक - मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस फारच अस्वस्थ आहेत, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. फडणवीसांनी जनतेने दिलेल्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. वकील परिषदेच्या सांगता समारोप कार्यक्रमानंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे
या कार्यक्रमात राज्यातील ४० वर्षांहून अधिक काळ वकिली केलेल्या २६ ज्येष्ठ वकिलांचा मंत्री छगन भुजबळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सावरकरांच्या मुद्द्यावर मत मतांतरे असून भाजपकडून त्याचा विपर्यास केला जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असे माझे मत होते. पण याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच असेल, असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. 'हे सरकार पडेल अशी टीका सुरू आहे. मात्र सरकार पाच वर्ष टिकणार असून भाजप सरकार पाडण्याचे प्रयत्न करुच शकत नाही', असेही ते म्हणाले.