नाशिक - मालेगाव येथील मोरझर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिल्लूसारखे दिसणारे पिलू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलही त्याच्यासोबत खेळू लागले. अशात एक चिमुकली त्याला घरात घेऊन आली. हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे ( Leopard calf at house Nashik ) असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांना धक्काच बसला. आठ दिवस बघून सुद्धा बछड्याची आई न आल्याने ठाकरे कुटुंबांनी बछड्याला वन विभागाच्या ( Forest Department Nashik ) स्वाधीन केले.
बिबट्या आला असे ऐकले तरी अनेकांच्या अंगाला घाम फुटतो. मात्र याला अपवाद ठरले आहे. मालेगावतील ठाकरे हे शेतकरी कुटुंब. वाट चुकलेले बिबट्याचे बछडे तब्बल आठवडाभर एका शेतकरी कुटुंबात मांजराच्या पिलुच्या भूमिकेत वाढले. बिबट्याचे हे बछडे आठवडाभर शेतकऱ्याच्या मायेखाली वाढल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. बछड्याची आई परत न आल्याने अखेर बछडे वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. आठ दिवस हे बछडे कुटुंबाचे सदस्य म्हणून राहिल्याने घरातील लहान-मोठ्यांना गहिवरून आले होते.
...पण ती आलीच नाही : सावधगिरी बाळगत आणि बछड्याला मायेची उब देत ठाकरे कुटुंबानी त्याला दररोज दीड लिटर दूध पाजले. इतकेच नव्हे तर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेवून जाईल, अशी काळजी देखील घेतली. मात्र वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घायला आलीच नाही.