नाशिक - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून अनेक राज्यात बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदतीसाठी पुढे येत असताना बागलाण तालुक्यातील व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटनेमार्फत सर्व कला शिक्षकांनी एकत्र येत सटाणा शहराच्या मुख्य चौकात कोरोना विषाणूचे चित्र काढून त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.
मालेगाव शहरामध्ये वाढलेली रुग्णसंख्या आणि सटाणा शहराचे मालेगावपासून जवळचे अंतर या पार्श्वभूमीवर आता सटाणा पोलीस ठाणे, नगरपरिषद यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. सटाणा शहरात आजपर्यंत एकही बाधित रुग्ण न सापडल्याने सुरक्षितता आहे. मात्र, मालेगावची संख्या वाढली तर, सटाणा शहराला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कला शिक्षक संघटना व सटाणा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सटाणा शहरातील मुख्य चौकात कोरोना विषाणूचे चित्र काढून व त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून नागरिकांना घरातून बाहेर निघण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे.
या कामासाठी कलाशिक्षक संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष धनंजय सोनवणे, कमलाकर शेवाळे, दिगंबर अहिरे, नंदकिशोर जाधव, शिवाजी भोसले, नंदकिशोर शेवाळे, नंदन मोरे, उमेश पानपाटील, प्रवीण अहिरे, राजेंद्र मोरे, नंदन मोरे, दीपक वडगे, रुपेश सोनवणे आदि कला शिक्षकांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने पुढाकार घेऊन सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक पुंडलिक डंबाळे आदी उपस्थित होते.