नाशिक - दिंडोरी तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या तुफान गारपिटीची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रत्येक शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. नुकसान पाहणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले, की रात्रभर व आज सकाळपर्यंत दीड ते दोन फुटांपर्यंत गारांचे थर जमिनीवर होते. हे ऐकून दुः ख झाल्याचे झिरवळ म्हणाले.
दिंडोरी तालुक्यातील पाश्चिम पट्ट्यातील नाळेगाव, उमराळे, कोचरगावपासून ते सप्तश्रृंगीच्या गडाच्या पायथ्यापर्यंत कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात गारा पडलेल्या आहेत. त्यात नाळेगाव, उमराळे, कोचरगाव या भागातील भाजीपाला पीके, ऊस, भोपळा, द्राक्षांच्या नवीन फुटवाच्या काळ्या यांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच नाळेगावचे माजी सरपंच थेटे यांच्या घरावरील ६५ पत्रे उडून गेले आहेत. ते उघड्यावर आले आहेत. राज्यात कोरोनाचे संकट त्यात आता बेमोसमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सहकारी, कलेक्टर यांना राज्याचा विधानसभा उपाध्यक्ष या नात्याने विनंती करणार असल्याचे, झिरवळ यांनी सांगितले.