नाशिक - 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आली आहे. संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतरचा इतिहास आणि त्यांना दिलेल्या त्रासाची दृश्ये मालिकेत दाखवू नका, अशी मागणी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. त्यांच्या मागणीला या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने प्रतिसाद दिला आहे. नाशिक महानगरपालिका आयोजित पुष्पोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ती नाशिकमध्ये आली होती. या कार्यक्रमानंतर तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
खोतकर यांच्या मागणीचा मी सन्मान करते. मात्र, आत्ताच्या पिढीला आणि लहान मुलांनाही समजायला हवे की, संभाजी महाराजांनी किती सोसले आहे. त्यांना दिल्या गेलेला त्रास समोर आलाच पाहिजे, आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करू. मात्र, यामुळे लहान मुलांना त्रास होणार नाही, याची निश्चत काळजी घेतली जाईल, असे अश्विनीने सांगितले.