नाशिक - आशा गटप्रवर्तक कर्मचारी उद्यापासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील जवळपास 68 हजार कर्मचारी या संपात सहभागी होतील. अशी माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे राज्यध्यक्ष राजू देसले यांनी दिली आहे.
'प्रोत्साहन भत्ता मिळावा'
राज्यातील 68 हजार आशा गटप्रवर्तक कर्मचारी उद्यापासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. यामध्ये आम्हाला प्रोत्साहन भत्ता द्या, अतिशय तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करतोय, आमचे घर चालवनेही आता कठीण झालेले आहे अशी खंतही त्यांनी वेळेवेळी व्यक्त केली आहे.
'ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता'
आशा गटप्रवर्तकाच्या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर मोठा परिणाम होऊ शकतो, तसेच लसीकरण आणि कोरोना संदर्भात आशा कर्मचारी सध्या काम करत आहेत. हे सर्व कर्मचारी संपावर गेले तर या परिस्थितीवर परिणाम होईल. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने कर्मचाऱ्यांचा विचार करायला हवा. तसेच, लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.