नाशिक - द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा पदाधिकारी योगेश रामकृष्ण शिरसाठ याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्याने परदेशात द्राक्ष निर्यात करण्याचे आमिष दाखवून 35 शेतकऱ्यांची फसवणूक केली होती.
योगेश रामकृष्ण शिरसाठ याने सुमारे 35 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी 1 कोटी 90 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर तपासाला गती आली. त्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर योगेश शिरसाठ स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. वारंवार जागा बदलून फिरणाऱ्या योगेश शिरसाठ याला पोलिसांनी सिडकोतील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत पकडले आहे.
शिरसाठ याला पकडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक अशोक करपे यांचे अभिनंदन केले. आता लवकरात लवकर पैसे मिळावेत, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. योगेश शिरसाठ हा भारतीय युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. त्याने पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर चांदवडच्या बहादुरी गणातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्याचा पराभव झाला होता.