नाशिक - शहरात पुन्हा वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली. नाशिकच्या पिंजर घाट परिसरात घडलेल्या या घटनेत दोन वाहनं अडकली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सलग दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची संतधार सुरू असल्याने ही भिंत कोसळली.
जुने नाशिक भागातील जुन्या व धोकादायक वाड्यांचा विषय दर पावसाळ्यात येतो. मात्र, मनपा प्रशासन याकडे विशेष लक्ष देत नसल्याने पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास जोगवा वाड्याची भिंत कोसळली. या वाड्याच्या बांधकामात वीट व मातीचा वापर करण्यात आला आहे. जुन्या झालेल्या या वाड्याच्या भिंतीत पावसाचे पाणी मुरल्याने भिंत पडली आहे.
भिंत पडल्याचा जोरदार आवाज आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. काहींनी त्वरित अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली. सुदैवाने जीवितहानी नाही पण दोन दुचाकीचे नुकसान झाले आहे.