नाशिक - पत्नीचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याने त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी रणनिती आखणाऱ्या तडिपारासह चाैघा सराईतांना अटक करण्यात आली. सातपूरच्या आयटीआय पुलाजवळून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडून एक गावठी कट्टा, जीवंत काडतुसे, काेयते हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई अंबड पाेलिसांनी केली.
पोलिसांना मिळाली माहिती -
तडीपार असलेला निखिल उर्फ निकू अनिल बेग (२३, रा. द्वारका, नाशिक) याच्यासह रेकॉर्डवरील विशाल संजय अडागळे (२४, रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर), साहिल उर्फ सनी शरद गायकवाड (२३, रा. पंचवटी), ज्ञानेश्वर उर्फ निलेश कारभारी लोहकरे (२५, रा. महाराणा प्रताप चौक, सिडकाे) आणि रोशन संजय सूर्यवंशी (१९, रा. महाराणा प्रताप चौक, सिडकाे ) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. काही सराईत आयटीआय पुलाच्या जवळ एकाच्या खुनाचा कट रचत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गणेश शिंदे यांना मिळाली हाेती.
त्यानुसार वरिष्ठ पाेलीस निरीक्षक कुमार चौधरी, पाेलीस निरीक्षक नंदन बगाडे यांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. तसेच गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, अनिरुद्ध येवले, नितीन सानप, मुकेश गांगुर्डे, मुरली जाधव, योगेश शिरसाठ यांच्या पथकाने सापळा रचला. तर, संशयितांना पोलीस आल्याची माहिती कळताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - रवी राणांची आमदारकी धोक्यात?...अपात्रतेची कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
मात्र, पथकाने पाठलाग करुन चाैघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यात गंभीर बाब समाेर आली. अटक असलेल्या वरील संशयितांपैकी एकाच्या पत्नीचे बाहेरील व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी त्यांनी गावठी कट्टा व काेयता आणल्याचे निष्पन्न हाेत आहे. या सराईतांकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे, ३ कोयते हस्तगत केले आहेत. तसेच गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (दि.११) सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे.