दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे देव नदीला पूर आला. त्यात पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता तयार केला आहे. मात्र, पुरामुळे हा भराव देखील वाहून गेला आहे. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचा संपर्क तुटला आहे.
वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. तसेच पांडाणे येथे देव नदीच्या पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून पूलाच्या बाजून गोलाकार पाईप टाकून पर्यायी मार्ग तयार केला होता. मात्र, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सप्तश्रृंगी गडावर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे देव नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीवरील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांचा संपर्क तुटला असून वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी झाले असते. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले. त्यामुळे पुलाचे काम रखडले होते. मात्र, आता स्थानिक मजुरांच्या मदीने पुलाचे काम पूर्ण केले जात आहे.